म . टा . प्रतिनिधी , मुंबई
ज्या शिवाजी पार्कने (शिवतीर्थ) ' माझा हा बाळ मी महाराष्ट्राला अर्पण करीत आहे ', ही प्रबोधनकारांची वाणी ऐकली ... ज्या शिवाजी पार्कने ' जमलेल्या माझ्या तमाम हिंदू बांधवांनो , भगिनींनो आणि मातांनो ...' अशी कोट्यवधी मनांमध्ये धगधगते विचार चेतवणारे शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांची खणखणीत हाक ऐकली त्या शिवाजी पार्कने रविवारी अलोट जनसागराच्या अतीव दुःखाचा कल्लोळ अनुभवला . महाराष्ट्रातील कोट्यवधी जनांच्या हृदयात अढळ आदराचे व प्रेमाचे स्थान असणारे शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांना या ऐतिहासिक मैदानात रविवारी संध्याकाळी मावळत्या सूर्याच्या साक्षीने अखेरचा निरोप देण्यात आला ... ' बाळासाहेब अमर रहें ...' च्या घोषणांचा स्वर वाढला आणि शिवाजी पार्कातील प्रत्येक माणूस हेलावून गेला . शिवसेनेचे कार्यकारी प्रमुख उद्धव ठाकरे यांनी आपल्या पित्याच्या पार्थिवास मंत्राग्नी दिला आणि माथ्यावरील आभाळ नाहीसे झाल्याच्या भावनेने उपस्थित ठाकरे कुटुंबीय , लक्षावधी शिवसैनिक , तसेच हा दुःखद प्रसंग टीव्हीवर पाहणाऱ्या अवघ्या महाराष्ट्राचा शोक अनावर झाला . कित्येक दशके जनमानसावर अधिराज्य गाजवणारे बाळासाहेब देहरूपाने इहलोकातून निघून गेले ते कोटी कोटी जनतेच्या हृदयात कायमचे वसतिस्थान वसवून ...
रविवारी सकाळी नऊच्या सुमारास वांद्रे येथील ' मातोश्री ' येथून निघालेली बाळासाहेब यांची सुमारे पाच िकलोमीटर लांबीची महायात्रा नऊ तासांच्या प्रवासानंतर लाखो शिवसैनिकांच्या साक्षीने दुपारी साडेचार वाजता शिवाजी पार्क येथील मीनाताई ठाकरे यांच्या पुतळ्यापाशी आली . त्यावेळी सकाळपासूनच शिवाजी पार्कवर जमलेल्या शिवसैनिकांना दुःखावेग आवरणे कठीण झाले . संध्याकाळी पाच वाजता स्वातंत्र्यवीर सावरकर स्मारकासमोरील प्रवेशद्वारातून बाळासाहेबांचे पार्थिव सरकारी इतमामात शिवाजी पार्कवरील स्टेजवर आणण्यात आले . ` एकच वाघ , एकच वाघ , बाळासाहेब एकच वाघ ', ` परत या , परत या , बाळासाहेब परत या ' ` कोण आला रे कोण आला , शिवसेनेचा वाघ आला ' या घोषणांनी शिवाजी पार्कचे मैदान दुमदुमले . यावेळी राज्य आणि राष्ट्रीय पातळीवरील असंख्य बड्या नेत्यांनी बाळासाहेबांच्या पार्थिवाचे अंतिम दर्शन घेतले . त्यावेळी तेथे उभे असलेले उद्धव आणि राज यांचे त्यांनी सांत्वनही केले .
संध्याकाळी ५ . २०च्या सुमारास बाळासाहेबांचे पार्थिव अंत्यसंस्काराच्या ठिकाणी आणण्यात आले . त्यांच्या पार्थिवाभोवतीचा तिरंगा सन्मानाने काढून तो उद्धव यांच्या हाती सुपूर्द करण्यात आला . उद्ध्व यांनी अंत्यविधी सुरू केले तेव्हा बाळासाहेबांच्या पार्थिवापाशी बाळासाहेबांचे मेव्हणे चंदूमामा वैद्य , जयदेव ठाकरे , राज ठाकरे , आदित्य , राहुल आणि तेजस ही नातवंडे आदी कुटुंबीय उभे होते . श्री भय्यू महाराज यांचीही उपस्थिती होती .
हे विधी सुरू असतानाच उद्धव यांनी , बाळासाहेबांना सावलीसारखी साथ करणारे चंपासिंग थापा , बाळासाहेबांचे पी . ए . रवी म्हात्रे , डॉ . जलील परकार आणि त्यांचे सहकारी डॉक्टर , वॉर्डबॉय यांनाही अंतिम अभिवादन करण्यास बोलावले . ५ . ५०च्या सुमारास स्वतः उद्धव यांनी वडिलांचे अंतिम दर्शन घेतले , तेव्हा त्यांना अश्रू मोठ्या कष्टाने परतवावे लागत होते . पाठोपाठ राज , जयदेव यांनी अंत्यदर्शन घेतले . सकाळपासून धीरगंभीरपणे वावरणाऱ्या राज यांना यावेळी अश्रूंना बांध घालणे कठीण झाले . आदित्य , तेजस , राहुल आदी बाळासाहेबांची नातवंडे रडता रडताच परस्परांचे सांत्वन करत होती .
काही क्षणातच बाळासाहेबांचे पार्थिव चितेवर ठेवण्यात आले . पोलिसांनी बंदुकांच्या फैरींची सलामी दिली . पोलिस बँण्डने बिगुल धून वाजवून अखेरचे अभिवादन केल्यानंतर रामरक्षेचे पठण करण्यात आले . मंत्राग्नी देण्याच्या क्षणी उद्धव यांनी राज यांना हाताला धरून सोबत घेतले . पठणाच्या अखेरीस उद्धव यांनी चितेस अग्नी दिला . ' जब तक सूरज चांद रहेगा , बाळासाहेब आपका नाम रहेगा ', ' बाळासाहेब अमर रहे ' हा उद्घोष मनात साठवत जमलेले लाखो शिवसैनिक अत्यंत शिस्तीत परतले .
लाखोंची गर्दी
शिवसेनाप्रमुखांच्या अंत्यदर्शनासाठी महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून सुमारे १९ लाख लोक आल्याचा अंदाज व्यक्त करण्यात येत होता . त्याला पोलिसांनी अधिकृत दुजोरा दिला नाही . मात्र , अंत्ययात्रा आणि अंत्यदर्शनासाठी लोटलेली गर्दी काही लाखांच्या घरात होती असे पोलिसांचे म्हणणे होते .
No comments:
Post a Comment